प्लॅस्टिकची झोपडी

माझ्या सोसायटीसमोरच, मुख्य रस्त्याच्या कडेला एक माणूस राहतो. जिथे वाहतूक कधीच थांबत नाही. तो सायकली दुरुस्त करतो. छोट्या भागांपासून चेन, पंक्चर, ऑइलिंग वगैरे. गेली दोन वर्षे, कॉर्पोरेट मुंबई दिवस सुरू करण्याआधी, मी त्याला जवळजवळ रोज पाहत आले आहे.

त्याची एक छोटी चौकोनी झोपडी होती, प्लास्टिकच्या पत्र्यांची. इतकी लहान की सहा फूट उंच माणूस उभा राहिला तर त्याचे केस छपराला स्पर्श करतील. आणि जर तो आत झोपला तर कदाचित त्याला पाय दुमडावे लागले असते. तो कुठे झोपायचा, मला ठाऊक नाही. मी कधी विचारलेही नाही. पण रोज सकाळी, शहराचा गोंगाट वाढण्याआधी, तो प्लास्टिक काढायचा. आपली जागा उघडायचा आणि पूजा सुरू करायचा.

देवघर दाराशेजारीच ठेवलेले. रस्त्याच्या पलीकडून मला देव स्पष्ट दिसत नसे. फक्त त्याच्या हातातील दिवा दिसायचा, नंतर तो खाली ठेवलेला. अगरबत्तीचा धूर वर जाताना. जोडलेले हात. हलणारे ओठ. कधी तो हलके बोलत असे, जणू संवाद चालू आहे. कधी फक्त शांत उभा, वंदनेत.

हा क्रम मी दोन वर्षे पाहिला.

एका संध्याकाळी त्याला संध्याकाळची प्रार्थना करताना पाहिले. नेहमीसारखी सुंदर. पण दुसऱ्या दिवशी सकाळी झोपडी अर्ध्या उंचीची झाली होती.

जिथे तो आधी उभा राहू शकत होता, ती रचना कापली गेली होती. कमी झाली होती. एका रात्रीत. काय झाले, माहीत नाही. महापालिकेची कारवाई? हवामान? परिस्थिती? मला एवढंच कळलं की जे उंच होतं ते आता ठेंगणं झालं होतं.

पहिली प्रतिक्रिया सहज होती, मी रस्ता ओलांडून जाऊन विचारावं का, मदत हवी आहे का? मला वाईट वाटलं. फार नाट्यमय दुःख नाही, पण हलकंसं अस्वस्थ. ऑफिसला जाण्यासाठी रस्ता ओलांडायचा होतांच, आणि तो ओलांडला… आता तो स्पष्ट दिसत होता.

तो काय करत होता?

तेच. गेली दोन वर्षे रोज जे करत होता तेच. पूजा. दिवा पेटलेला. स्वच्छ. उजळ. नेहमीपेक्षा जास्त तेजस्वी भासणारा. हातात अगरबत्ती. चेहरा शांत. तक्रारीची एकही रेघ नाही. चिडचिड नाही. अस्वस्थता नाही. झोपडी लहान झाली होती; पण विधी नाही.

मी दोन-तीन सेकंद उभी राहिले… जावं का, थांबावं? आणि मग स्पष्ट झालं, काहीच करायचं नाही. दुरुस्त करायचं काहीच नाही. त्याला मदत नको होती. मी ऑफिसकडे वळले. मागे वळून पाहिलं तर पूजा संपवून तो पुन्हा सगळं नीट लावत होता. जुळवून घेत होता. जे आहे त्यात राहायला शिकत होता.

काही दिवस गेले. कदाचित एक – दोन आठवडे. झोपडी कायम अर्ध्या उंचीचीच राहिली. तो आता उभा राहत नाही; आरामात बसतो. काम तसंच, चेन साफ करणं, पंक्चर दुरुस्त करणं, भागांना तेल लावणं. दर संध्याकाळी संध्या. मुख्य रस्त्यावर, मुंबईच्या मध्यभागी, सततच्या गोंगाटात. त्या जागेत काहीच शांत नाही. तरीही साधना सुरूच आहे.

जीवनाने काहीतरी केलं. रचना कमी झाली. आणि ते सगळं त्याने स्वीकारलं. जुळवलं. पुढे चालू ठेवलं. त्याच्या चेहऱ्यावर कुरकुरीची एकही रेषा मी पाहिली नाही.

तो माणूस नाही का? नक्कीच आहे. कदाचित तो एकट्याने रडला असेल. हादरला असेल. कमी झालेलं स्वीकारताना त्यालाही वेदना झाल्या असतील. आपल्याला ठाऊक नाही. पण त्याचा धर्म सुटला नाही.

तुम्ही आयुष्याबद्दल रडू शकता. भावना चूकीच्या नाहीत. पण धर्म परिपूर्ण भावनिक हवामानाची वाट पाहत नाही. त्याने काम केलं. दिवा लावला. पुढे चालू ठेवलं.

मला दत्तात्रेयांची आठवण झाली… ज्यांनी २४ गुरू मानले, निसर्गातून, प्राण्यांतून, साध्या मानवी प्रसंगांतून शिकले. ज्ञान केवळ उंच आसनावर बसलेलं नसतं. कधी ते गजबजलेल्या रस्त्याच्या कडेला, प्लास्टिकच्या झोपडीत बसलेलं असतं.

तुमच्याभोवती गुरू आहेत. सर्वत्र.

त्या सकाळी मला एक साधी गोष्ट उमगली. जीवन कधी कधी तुमच्या झोपडीची उंची कमी करतं. बाह्य अवकाश कमी होतं. सोयी बदलतात. उभं राहणं बसण्यात बदलतं. पण दिवा स्थिर राहू शकतो.

अखंड तक्रार सुरू केली की सातत्य तुटतं. स्वीकारलं, जुळवलं की काहीतरी आत मजबूत होतं. झोपडी अर्धी झाली. ज्योत नाही.

जीवन नेहेमीच काहीतरी फेकेल. स्वीकारा. जुळवा. मार्ग काढून चालत रहा

थांबू नका.